पंकजा मुंडेंना यंदाही संधी नाहीच; एकनाथ खडसे म्हणाले, वाट न पाहता थेट...
राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे शिंदे गटासोबतच आता भाजपमध्येही नाराजी असल्याचं समोर येतंय. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारात यावेळीसुद्धा स्थान मिळालेलं नाही. यावर पंकजा यांनी उघडपणे भाजप नेतृत्वावर कोणतीही नाराजी व्यक्त केली नसली तरी, त्यांचे समर्थक नाराज असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांनीही पंकजा मुंडेंना सल्ला दिलाय, की पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची वाट पाहण्यापेक्षा थेट वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करावी.
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने अनेक बड्या ओबीसी नेत्यांना बाजूला केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. ते म्हणाले, अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाशी संबंधित लोकांना बाजूला केलं जातंय. पंकजा मुंडे यांच्यावर सातत्यानं अन्याय होतोय. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. पंकजा मुंडे यांना माझ्या शुभेच्छा. मात्र, मंत्रिमंडळात येण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी वेळ न दवडता वरिष्ठांना भेटावं असं एकनाथ खडसे म्हणाले.
"गोपीनाथ मुंडे यांच्या नीकटवर्तीयांना भाजपने डावललं"
एकनाथ खडसे यांनी यावेळी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. खडसे म्हणाले, मी सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत होतो. भाजपमध्ये जे मुंडे यांच्या जवळचे होते ते आता बाजूला झाले आहेत. मात्र, भविष्यात त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षाही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. सत्ता आल्यानंतर ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याबद्दल पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. पत्रकारांनी पंकजा यांना विचारले की, तुमचे नाव नेहमीच चर्चेत असते, पण तुम्हाला मंत्रीपद मिळत नाही. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, 'माझं नाव चर्चेत राहण्यासारखं आहे. पण माझ्यापेक्षा जास्त पात्र लोक असतील. जेव्हा त्यांना वाटेल की मी पात्र आहे तेव्हा ते मला संधी देतील. विरोध करण्याचं काहीही कारण नाही. मी पात्र आहे असे वाटल्यावर ते मला संधी देतील, यात माझी कोणतीही भूमिका नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी खदखद व्यक्त केली.