Eid al-Fitr 2022 : चंद्र दिसला...राष्ट्रपतींसह, PM मोदींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा
Eid al-Fitr 2022 : जगभरात उद्या (मंगळवार) ईद-उल-फित्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार आहे. शव्वालचा चंद्र सोमवारी संध्याकाळी दिसला आहे. त्यामुळे सोमवारी 30 वा उपवास होता आणि 3 मे रोजी ईद साजरी होणार आहे. रमजान महिन्याचे रोजे अर्थात उपवास झाल्यानंतर मोठ्या आनंदाने रमजान ईद (Ramdan Eid 2022) अर्थाक ईद-उल-फित्र हा सण साजरा केला जातो.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, 'ईद-उल-फित्रच्या निमित्ताने मी सर्व देशवासियांना, विशेषत: मुस्लिम बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण लोकांना एक सुसंवादी, शांततापूर्ण आणि समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देतो. ईदच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी मानवतेच्या सेवेसाठी आणि गरजूंचे जीवन सुधारण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प करूया.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभ प्रसंगी आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढीस लागो. सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.