शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश' शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची माहिती
राज्य सरकार आता 'एक राज्य, एक गणवेश' या योजनेची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून करण्याच्या तयारीत आहे. या योजनेची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. या योजनेनुसार राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. त्यात सर्व विद्यार्थ्यांना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅट परिधान करावे लागणार आहे. या योजनेची अमंलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून करणार आहे.
मात्र काही शाळांनी या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर दिल्याने विद्यार्थी आठवड्यातील तीन दिवस सरकारी योजनेचा आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे.
सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये एकच गणवेश करण्याचा विचार
गणवेशाचा रंगच माहित नसल्याने कोणत्या गणवेशाची ऑर्डर द्यायची? असा प्रश्न शाळा प्रशासनाला पडला होता. अखेर शिक्षण विभागाने याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशासाठी निधी मिळतो आणि विद्यार्थी संख्येनुसार तो शाळांना दिला जातो. त्यानंतर शाळा व्यवस्थापन कापड खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कपड्यांचे माप घेऊन गणवेश शिवून घेण्याची ऑर्डर देते. नव्या शैक्षणिक वर्षात सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये एकच गणवेश करण्याचा विचार शिक्षण विभागाने घेतला आहे.