Congress Protest : सोनियांच्या ईडी चौकशीवरून काँग्रेस कार्यकर्ते संतापले, पक्षाच्या नेत्याचीचं गाडी जाळली
ED Sonia Gandhi Questioning : नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते केंद्र सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. बेंगळुरूमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करत सँट्रो कार पेटवून दिली. (ed sonia gandhi questioning congress workers protest in bengaluru burned colleague car)
ही कार एका काँग्रेस कार्यकर्त्याची असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्याच्या निषेधार्थ त्यांनी हे कृत्य केले. याशिवाय शेषाद्रिपुरम, नेहरू जंक्शन येथेही एक कार जाळल्याचे वृत्त आहे, ज्याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
काँग्रेसची देशभर आंदोलन, पोलीस सतर्क
सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काँग्रेसकडून ईडीच्या विरोधात आंदोलन करण्यात येण्याची शक्यता असल्यानं पोलीस सतर्क झाल्या आहेत. काँग्रेस मुख्यालय २४ अकबर रोड येथे पोलिसांनी बॅरिकेटस लावले आहेत.
काय आहे प्रकरण?
'द असोसिएटेड जर्नल लिमिटेड' या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले 'नॅशनल हेरॉल्ड' हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या 'यंग इंडिया' कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने 'नॅशनल हेराल्ड'ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. 'द असोसिएटेड जर्नल'ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ साली दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु केली होती.