ED ची मोठी कारवाई : शिवसेना नेते संजय राऊत यांची संपत्ती जप्त
शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) (ED)आज मोठी कारवाई केली. त्यांची अलिबाग व मुंबई येथील संपत्ती जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे शिवसेनेत खळबळ माजली आहे.
संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरु होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून ई़डीविरोधात ते आक्रमक झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यापुर्वी सक्तवसुली संचालनालयाने १ हजार ०३४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपाखाली संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली होती. या प्रकरणी ईडीने सुजीत पाटकर यांच्या घरावर छापा टाकला होता. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींच्या एका कंपनीत भागीदार आहेत. प्रवीण राऊत हे गुरू आशीष कंपनीचे संचालक आहेत. यापूर्वी प्रवीण राऊत यांचे नाव सन २०२० च्या डिसेंबर महिन्यात पीएमसी बँक घोटाळ्याच्या वेळी चर्चेत आले होते.
काय आहे पत्राचाळ घोटाळा
ईडीने प्रवीण राऊत यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल केलं हे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हे दोषारोपत्र दाखल करण्यात आलं आहे. प्रवीण राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्यात अटक केली होती. सन २०१० मध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांनी संजय राऊत यांच्या पत्नीला ५५ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. या पैशांचा उपयोग करत त्यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केले होते. मात्र यावर चर्चा झाल्यानंतर आपण माधुरी राऊत यांच्याकडून घेतलेले पैसे त्यांना परत केल्याचे राऊत यांच्या पत्नीने म्हटले होते. एचडीआयएलमध्ये १ हजार ०३४ कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आले. त्यांच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात पैसे वळते करण्यात आले होते अशी माहिती ईडीला मिळाल्याच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.