बीड: यंदा नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा
बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गडावर यंदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नारायण गडावर समस्त मराठा समाजाची महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यभरातून येणाऱ्या सकल मराठा समाजाचे नियोजन नेमक्या कशा स्वरूपात असणार हे ठरविण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज नारायण गडावर दाखल होणार असून आतापर्यंतच्या सर्व गर्दीचे रेकॉर्ड मोडेल असं मराठा सेवकांनी सांगितले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी समाज बांधव इथे येणार आहे.
दरम्यान याच वेळी बीड जिल्ह्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील दसरा मेळावा असणार आहे. जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होतोय. त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. हा दसरा मेळावा राजकीय नसणार हे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. मात्र जरांगे पाटलांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.