Dengue: पावसामुळे राज्यात यंदा डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ
गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने जोर पकडला आहे. वाढलेल्या पावसामुळे शहरात डेंग्यू, मलेरियाच्या संशयित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यामध्ये महिनाभरात हिवतापाचे 2924 रुग्ण सापडले असून हिवतापाच्या रुग्णांची संख्या 7447 वर पोहोचली आहे. तर डेंग्यूचे 2 हजार 163 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नागरिकांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
एका बाजूला शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सर्दी, खोकला व तापाचे रुग्णही वाढत आहेत. बदललेल्या हवामानामुळे विषाणूजन्य आजार पसरत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 21 जून ते 18 जुलै या एक महिन्याच्या कालावधीत हिवतापाचे 2924 रुग्ण सापडले आहेत.
गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 1826 रुग्ण सापडले आहेत. मुंबईमध्ये 657, चंद्रपूरमध्ये 105 आणि पनवेलमध्ये 37 रुग्ण सापडले आहेत. जुलैमध्ये हिवतापामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून, हे तिन्ही मृत्यू गडचिरोलीमध्ये झाले आहेत. डेंग्यू हा शुद्ध पाण्यातील एडीस डास चावल्याने होतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला ताप येणे, अंग दुखी इत्यादी लक्षणं जाणवतात. त्याचबरोबर ताप कमी झाल्यानंतर लालसरपणा येणं, हाता पायाला खाज सुटणे, पित्ताशय सूज येऊन धाप लागणे इत्यादी त्रास जाणवू लागतात. त्यामुळे डेंग्यूची लक्षणं दिसताच तात्काळ वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे.