डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदेंनी उधळले 'राजकीय' रंग; म्हणाले, "आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आणि..."
संपूर्ण देशभरात होळी-धुळवडचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नेतेमंडळींनी राजकीय रंग उधळण्यास सुरुवात केलीय. डोंबिवली शहर शाखेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रंगपंचमी साजरी केली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. खासदार शिंदे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देखील दिल्या. तसंच माध्यमांशी संवाद साधून मोठं वक्तव्य केलं. आज वेगवेगळ्या रंगात जरी रंगलो असलो, तरी आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा जो रंग आहे, तो भगवा रंग आहे. हिंदुत्वाचा रंग आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा रंग आहे आणि त्या भगव्या रंगाला आम्ही पुढे घेऊन जाण्याचे काम करतोय, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी राजकीय रंग उधळले.
श्रीकांत शिंदे म्हणाले, "देशात चारशे पार, तर महाराष्ट्रात ४५ पार, या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात आहोत. येत्या निवडणुकीत कोणाला मत द्यायचं आहे, हे लोकांनी ठरवलं आहे. महायुतीचे खासदार पुन्हा निवडून येतील व पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करतील. कल्याणमध्ये झालेल्या विकास कामांमुळे लोक समाधानी आहेत. मला २०१४ मध्ये अडीच लाखांचं मताधिक्य होतं.
२०१९ मध्ये साडेतीन लाखांचं मताधिक्य होतं. यंदाही लोक विक्रमी मदाधिक्क्यानं निवडून देणार," असा विश्वासही श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर येथील गोल मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या धुळवड उत्सवालाही उपस्थिती दर्शवली.