अल्पवयीन मुलांकडून डोंबिवली पोलिसांनी 22 महागडे मोबाईल आणि दहा सायकली केल्या जप्त
कल्याण (अमजद खान) : लोकांचे महागडे मोबाईल आणि मुलांची सायकल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांकडून पोलिसांनी 22 महागडे मोबाईल आणि दहा सायकल हस्तगत केल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Dombivli police seized 22 expensive mobile phones and ten bicycles from minors)
कल्याण डोंबिवलीत घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल चोरी या विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. तपास पथके तयार करण्यात आली आहे. त्याचा फायदा आत्ता दिसून येत आहे. अनेक गुन्हे उघड केले आहेत. असा एक गुन्हा डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी उघडीस आणला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी योगेश सानप, पोलिस कर्मचारी विशाल वाघ, शंकर निवडे, प्रशांत सरनाईक आणि नितीन सांगळे यांच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
हे दोघे लहान मुलांच्या सायकल घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना हटकले. विचारपूस केली तेव्हा हे दोघे मोबाईल आणि सायकल चोरी करत असल्याचे उघड झाले. धक्कादायक म्हणजे यांच्याकडून पोलिसांनी महागडे मोबाईल आणि सायकल जप्त केल्या आहेत. मजा मस्तीसाठी हे दोघे चोरी करीत होते ही बाब उघड झाली आहे. दोघे शहरात फिरायचे लोकांच्या घराबाहेर उभी असलेली सायकल तसेच घराच्या खिडकीत ठेवलेले मोबाईल घेऊन पसार व्हायचे. पोलिस पुढील तपास करत आहेत.