दिवाळीचं रॉकेट बाल्कनीत पडल्यानं घराला आग; बदलापूरच्या खरवई परिसरातील घटना
बदलापूरमध्ये एक दुर्घटना घडली आहे. फटाके फोडताना उडवलेलं रॉकेट एका घराच्या बाल्कनीत जाऊन पडल्यानं घराला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यावेळेस घरात कुणीही नसल्यानं कुणालाही इजा झाली नाही. मात्र घरातील काही साहित्य जळून खाक झालं.
बदलापूरच्या खरवई परिसरातील प्रेशियस हेरिटेज इमारतीत गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली. या इमारतीबाहेर कुणीतरी फटाके फोडताना उडवलेलं रॉकेट थेट ४०५ क्रमांकाच्या फ्लॅटच्या बाल्कनीत येऊन पडलं. त्यामुळे बाल्कनीत असलेल्या साहित्याने पेट घेतला आणि मोठी आग लागली. आगीत बाल्कनीत असलेली पुस्तकं, सायकल आणि लाकडी साहित्य जाळून खाक झालं. इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला माहिती देताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि आग विझवल्यानं मोठं नुकसान टळलं. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात नागरिकांनी घर बंद करून जाताना बाल्कनीत कपडे, ज्वलनशील पदार्थ ठेवू नये, असं आवाहन अग्निशमन दलानं केलं आहे.