जांब समर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडून दखल; साधला फोनवरून संवाद

जांब समर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडून दखल; साधला फोनवरून संवाद

चोरटे लवकरच जेरबंद होतील-- मुख्यमंत्र्यांचं समर्थ रामदासांचे 11 वे वंशज भूषण स्वामी यांना आश्वासन
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रवी जैस्वाल, जालना

जालन्यातील जांब समर्थ येथील राम मंदिरातील सात पंचधातूंच्या मूर्ती चोरी प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. समर्थ रामदास स्वामींचे पूर्वज भूषण स्वामी यांच्याशी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनी मोबाईलद्वारे संपर्क साधला असून लवकरच चोरटे जेरबंद होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी समर्थ रामदासांचे 11 वे वंशज भूषण स्वामी यांना फोनवरून दिलीय.

जांब समर्थ येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरातील राम, लक्ष्मण आणि सीतेसह सहा पंचधातूंच्या प्राचीन मुर्त्यांची अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून चोरी केली. याप्रकरणी तपास व्हावा आणि भाविकांची श्रद्धा असलेल्या मूर्तींचा शोध घेण्यात यावा तसेच चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी गावकऱ्यांसह भाविकांनी केली होती. यासाठी अन्नत्याग आंदोलनही केले होते. त्यानंतर आज माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जांबसमर्थ येथे भेट दिली. स्वामींचे अकरावे वंशज भूषण स्वामी, स्थानिक पुजारी आणि ग्रामस्थांची भेट घेतली.

तसेच तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोबाईल वरून संपर्क करून घटनेची तीव्रता लक्षात आणून दिली. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी भूषण स्वामींसोबत थेट संवाद साधत याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून लक्ष घातले जाईल असे सांगितले. मुंबईवरून तांत्रिक पथक पाठविले असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल आणि आरोपींना जेरबंद केले जाईल अशी ग्वाही दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com