"भाजपा आमचा शत्रु नाही, त्यामुळे..."; दिपाली सय्यद यांची पोस्ट व्हायरल
शिवसेनेतून तब्बल 40 आमदार घेऊन तत्कालीन नगरविकास मंंत्री असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सरकारमधून बाहेर पडले आणि भाजपसोबत (BJP) जात त्यांनी सरकार स्थापन केलं. यामुळे मागच्या काही कालावधीमध्ये राज्यात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अन् राज्यात नवं सरकार आलं. मात्र दुसरीकडे शिवसेना-भाजपमध्ये असलेला संघर्ष संपण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी नुकतीच याबद्दल एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडिावर व्हायरल झाली आहे.
दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे की, "मला माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजुन किरीट सोमय्या आणि दोन भाजपचे अन्य दोन वाचाळविर आदरणीय उध्दव साहेब व शिवसेनेवर टिका करतील तर त्यांना एवढच सांगणे आहे कि, आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढु नका. आदरणीय शिंदे साहेबांनी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजपा आमची शत्रु नाही आणि त्यांच्या विरुध्द आम्हाला बोलण्यास आनंदही नाही परंतु वाचाळविरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही पण भाजपाने याची दखल घेणे गरजेचे आहे."