"शिवसैनिक की काँग्रेस-राष्ट्रवादी? कोण जवळचं हे उद्धव साहेबांनी ठरवावं"
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सामान्य नागरिकांच देखील म्हणणं आहे की, आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत बसू नये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यामुळे सत्तेत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला संपवणार होते. आजपर्यंत अध्यक्ष यांच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उद्धव साहेब काही बोलतील त्यावर आम्ही चुकूनही बोलणार नाहीत. आमच्या मित्रपक्षातून कोणी त्यांना काही बोललं तर ते सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही असं शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी सांगितलं आहे. मात्र, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या स्टेटमेंटवर काही बोलणार नाही याचा अर्थ असा नाही की, आम्ही कोणालाच उत्तर देणार नाही. मला 100 फोन्स येतात आणि ते सगळे शिवसैनिक असतात. ते सगळे माझं अभिनंदन करतात असं केसरकर म्हणाले. (Dipak Kesarkar Press Conference)
मोदी आल्यामुळे भाजप शिवसेनेला अधिक मतं मिळाली. वस्तुस्थिती कधी तरी स्वीकारावी लागते. मैत्रीमध्ये हे सगळं चालतं आणि ही मैत्री पुन्हा व्हावी असं आम्हाला वाटतं. उद्धव ठाकरे यांचा पगडा नाहीसा होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे आता राज्यसभेवर खासदार आहेत. मोदी ठाकरे साहेबांना धाकटा भाऊ मानतात, भाजप कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना साहेब मानतात. राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून कोणी असं बोलेल का? असा सवाल केसरकरांनी केला आहे. यातून कुटुंब प्रमुख मार्ग काढतील, तुमचं मन दुखावलं गेलं तसं शिंदे साहेब यांचंही मन दुखावलं गेलंय. आज पवार साहेब जास्त लाडके झाले आणि शिवसैनिक लांबचे झाले. उद्धव साहेब यांनी ठरवावं की कोण आपलं आहे. त्यांचं देणं उद्धव ठाकरे यांनी फेडलेलं आहे आणि आम्ही मात्र बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत असं म्हणत केसरकर यांनी शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.