"मला धक्का बसलाय, कारवाई मागे घेतली असली तरी..."; आढळराव पाटलांची प्रतिक्रिया
शिवसेनेमध्ये झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीमुळे सध्या पक्षात खळबळ निर्माण झाली आहे. सरकार अन् विशेषत: शिवसेनेकडील मुख्यमंत्री पद गेल्यानंतर आता शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी आता पक्षातील बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यादरम्यानच शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार दिलीप आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात शिवसेनेकडून एक वेगळा खुलासा करण्यात आला आहे.
दिलीप आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची बातमी चुकीची असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. याबद्दल पक्षानेच दिलगिरी व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडीनंतर आता आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "मला क्षणभर कळेना, विश्वास बसेना...सामना वाचला त्यातून समजलं माझ्यावर कारवाई झाली. रात्रीच उद्धव ठाकरे यांच्याही बोललो होतो. मात्र सकाळी बातमी समजली आणि धक्का बसला. वाईट वाटलं, मी राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. त्यात मला काही चूक वाटली नाही. 18 वर्ष मी सेनेत आहे. लोकं चर्चा करतात पण मी बाहेर गेलो नाही. मंगळवारी उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. मागिल 4/5 दिवसात वातावरण तापलं आहे. पण माझं काय चुकलं? माझ्यावरच कारवाई का? मी पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला अंगावर घेतलं, संघर्ष केला. पवार साहेबांनी 2009 ला मला ऑफर दिली होती, तरी मी गेलो नाही. आज खासदार नसून सुद्धा शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी लढत आहे असं म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला.
मी काय पक्षविरोधी काम केलं? मला हे खूप लागलं आहे. आता कारवाई मागे घेतली पण मला वाईट वाटतं आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. यावरून पक्षात माझी काय स्थिती काय हे समजलं. माझी एकच चूक झाली मी राष्ट्रवादीला अंगावर घेतलं. उद्धव ठाकरे यांना मी जाब विचारला. मलाही हळहळ वाटते. मात्र त्यांनी प्रेस नोट काढून माझ्यावरची कारवाई मागे घेतली आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती करतो असं ते म्हणाले.