विशालगडाच्या अतिक्रमणाबाबत खासदार धनंजय महाडिक यांचं मोठं विधान; म्हणाले, इंडिया आघाडीनं..."
Dhananjay Mahadik Press Conference: विशाल गडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला. १४ जुलैला सुरु झालेल्या आंदोलनाला गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात हिंसक वळण लागलं. त्यानंतर संभाजीराजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता विशालगडाच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषेदत मोठं भाष्य केलं आहे.
काय म्हणाले खासदार धनंजय महाडिक?
१४ तारखेला विशाळगडावर घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. हा प्रकार म्हणजे शिवभक्तांचा आक्रोश आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक हिंदुत्ववादी संघटना अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन करत होत्या. आता अतिक्रमण काढायला सुरुवात झालीय. मात्र,यानंतर जिल्ह्यात राजकारण सुरू झालेलं आहे. इंडिया आघाडीच्या वतीने दिलेली मदत म्हणजे ढोंगीपणा आणि पुतना मावशीचे प्रेम आहे. माजी पालकमंत्र्यांनी यापूर्वी अनेक वर्ष दंगल होणार, असं सांगितलं होतं. या घडलेल्या घटनेचा खरा सूत्रधार कोण,याची चौकशी करणे गरजेचे आहे. खासदारांनी शिवभक्तांना अतिरेकी संबोधलं आहे, हे फार दुर्देवी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड सुरक्षीत राहिले पाहिजेत.अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. गड किल्ले ही आपल्या सर्वांची आस्था आहे. महाविकास आघाडीने शिवभक्तांना अतिरेकी संबोधणं चुकीचं आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनीही हिंदू समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत. हिंदू समाजाच्या लोकांना अतिरेकी म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. काँग्रेसची मंडळी कुणासोबत आहेत, हे जाहीर करायला हवं. अतिक्रमणाचं ते समर्थन करतात का? असाही सवालही महाडीक यांनी उपस्थित केला आहे.
माजी पालकमंत्र्यांनी सोयीस्कर राजकारण करत प्रशासनावरच खापर फोडलं आहे. विशाळगडावरील अतिक्रमण मागील १५ ते २० वर्षांपासून सुरु आहे. पण त्या काळात माजी पालकमंत्र्यांचं सरकार असताना अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी काय केलं? असा प्रश्न महाडीक यांनी उपस्थित केला. संभाजीराजेंना माजी पालकमंत्र्यांनी का थांबवलं नाही? माजी पालकमंत्री सोयीस्कर भूमिका बदलणार का? एकाने म्हणायचं पाडा, एकाने म्हणायचं जोडा, अशाप्रकारच्या दोन भूमिका कशा घेतात? हा प्रकार लोकांना दिशाभूल करणारं आहे, असंही महाडीक म्हणाले.