Pune Hit And Run Case: अल्पवयीन मुलाला मारहाण करणारे पोलिसांच्या रडारवर; रश्मी शुक्लांनी दिले कारवाईचे आदेश
Rashmi Shukla On Pune Hit And Run Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीला सहा जणांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अल्पवयीन मुलाला मारहाण केलेले आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद्य अवस्थेत भरधाव वेगाने पोर्शे कार चालवून दोन जणांचा बळी घेतला होता. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. हा अल्पवयीन मुलगा अपघात झाल्यानंतर कारच्या बाहेर पडल्यावर त्याला सहा जणांनी मारहाण केली होती. त्यामुळे या सहा जणांवर कारवाई करण्याचे आदेश रश्मी शुक्ला यांनी पोलिसांना दिले आहेत.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात (५ जूनपर्यंत) ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय बाल हक्क मंडळाने दिला होता. या प्रकरणात अल्पवयीनचा जामीन रद्द करण्यात आला. त्यानंतर त्याला रिमांड होममध्ये ठेवण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. संपूर्ण तपास होईपर्यंत त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अल्पवयीन अज्ञान आहे की सज्ञान याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.