औरंगाबादनंतर देवेंद्र फडणवीस यांचा जालनामध्ये जल आक्रोश मोर्चा
रवी जयस्वाल | जालना : जिल्ह्याला अनेकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे सर्वसामान्यांना नागरिकांसह शेतकऱ्यांनाही नाहक त्रासाला सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील (Aurangabad) जल आक्रोश मोर्चानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली जालना नगर परिषदेवर जल आक्रोश मोर्चा (Jal Akrosh Morcha) काढण्यात येणार आहे.
देवेंद्र फडणवीस आज जालना शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जालना नगर परिषदेवर जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील मामा चौक ते गांधी चमन चौक असा जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा संपल्यानंतर गांधी चमन चौकात फडणवीस यांची सभा देखील होणार आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे यांसह भाजपचे आमदार देखील उपस्थित असतील.
यावेळी भाजपकडून आगामी नगर परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या भाजपच्या जलआक्रोश मोर्चात भाजप मोठं शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.