"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल
२५ कोटी लोकांना गरिबी रेषेतून बाहेर काढण्याचं काम मोदींनी केलं. दिनदलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, भटके,विमुक्त या सर्वांसाठी मोदींनी कल्याणकारी योजना आणल्या. त्या मोदींच्या पाठिशी फलटण तालुका उभा राहण्यासाठी मी इथे आलो आहे. तुमचा आशीर्वाद भारताला द्या, यावेळचं मत भाजपला नाही, तर भारताला आहे. काही लोक आपल्याकडे तुतारी घेऊन येत आहेत. पण तुतारीची आता पिपाणी करायची आहे. त्यांना हे विचारायचं आहे, इतके वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. त्या सत्तेत तुम्ही काय केलं आहे, ते सांगा. रणजितसिंह नाईक निंबाळकर पाच वर्षात एव्हढा विकास करू शकतात, मग तुम्ही का करू शकला नाहीत, असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना केला आहे. ते फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
जनतेला संबोधीत करताना फडणवीस पुढे म्हणाले, तुमच्या आशीर्वादाने शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं. २३ वर्ष बंद असलेल्या प्रकल्पाचं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भूमिपूजन केलं. प्रकल्पाचं काम सुरु केलं. फलटण-बारामती, फलटण-पंढरपूर रेल्वे असो, पंढरपूर रेल्वेचं काम शक्य नव्हतं. ते मला म्हणाले, ९२१ कोटी द्यायचे आहेत. आम्ही त्यांना ९२१ कोटी रुपये मंजूर करुन दिले. आता फलटण-पंढरपूर रेल्वेचं काम देखील लवकरच सुरु होत आहे.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प आम्ही किती वर्ष ऐकतोय. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर फाईल उघडली, तेव्हा समजलं पाणीच नाही. प्रकल्प डब्बा बंद आहे. कृष्णा नदीचं पाणी भीमा नदीत आणायचं होतं, त्यासाठी आम्ही मार्ग काढला. तेव्हा लक्षात आलं, सांगली, कोल्हापूरात दरवर्षी पूर येतो. पुराचं पाणी वाहून जातं. दरवर्षी शहरांवर संकट येतं. हे पुराचं पाणी दुष्काळी भागात आणता आलं, तर कसं होईल, असा प्रश्न पडला होता.
त्यानंतर आम्ही फ्लड डायव्हर्जन प्रकल्प सुरु केला. ४ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला वर्ल्ड बँकेने मान्यता दिली. मोदी सरकारने मान्यता दिली. आता तो प्रकल्प पुढे चालला आहे. प्रत्येक निवडणुकीत त्याच घोषणा करायच्या आणि टाळ्या वाजवायच्या, असं नाही. आमचं प्रगती पुस्तक पाहा, जे जे सांगितलं, ते आम्ही करुन दाखवलं. तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत. दुसरीकडे राहुल गांधी आहेत. रणजितसिंह निंबाळकरांना मत दिल्यावर तुमचे आशीर्वाद थेट नरेंद्र मोदींना मिळतात.
ही साधी निवडणूक नाही, या देशाची निवडणूक आहे. ज्या नेत्याला देश माहिती आहे. जो नेता देशाला सुरक्षीत ठेऊ शकतो, असा नेता देशासाठी निवडायचा आहे. जो नेता या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो, तुमची प्रगती करु शकतो, जो नेता तुमच्या आशा-आकांशा पूर्ण करु शकतो, असा एकच नेता या देशात आहे. त्या नेत्याचं नाव नरेंद्र मोदी आहे, असंही फडणवीस म्हणाले.