महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका; म्हणाले...

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका; म्हणाले...

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणुकीचा शंखनाद झालाय. अर्थात आमच्याकरता शंखनाद झालाय. काहींकरता ऐलान झाला आहे. पण आज यानिमित्ताने आमच्या महायुती सरकारने दोन सव्वादोन वर्षामध्ये जे काही कार्य केलेलं आहे. त्याचे एक रिपोर्ट कार्ड आम्ही आपल्यापुढे ठेवतो आहोत. एक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं असेल स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार हे गेल्या दोन, सव्वादोन वर्षामध्ये महाराष्ट्राने बघितलं आहे. ज्या वेगाने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे परिवर्तनीय परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या. या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही गोष्टी सांगणाऱ्या आहेत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेती वीजेकरता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 14 हजार मेगावॅट वीज निर्मितीचं काम केलं गेलं सोलरच्या माध्यमातून आणि पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये याचं सगळे काम डिलीव्हर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज ही आम्ही उपलब्ध करुन देऊ. हा एक अत्यंत क्रांतीकारी निर्णय आणि याचे काम आम्ही सुरु केलेलं आहे. साडेआठ रुपयाने जी वीज पडायची ती वीज आता केवळ 3 रुपयाने पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 10 हजार कोटी रुपये बजेटमधलं आणि 5 हजार कोटी रुपये क्रॉस सबसिडीचं आम्ही यातून वाचवणार आहोत. याच्याआधारावर आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीजेची योजना आणली.

मागच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये घोषणा केली आणि नंतर बदलून गेलं. असा हा निर्णय नाही. वर्षानुवर्ष हा निर्णय चालेलं असा निर्णय घेतलेला आहे. दुसरं महत्वाचा आम्ही निर्णय केला की शेतकऱ्यांना मागेल त्याला सौरपंप किंवा 10 टक्के पैसे भरायचं आणि त्याला सौरपंप मिळेल 25 वर्ष वीजेचं बील येणार नाही. 5 वर्ष ही सगळी देखरेख हे सरकार करेल. वीजेच्या बाबतीत शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचे काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून हे झालेलं आहे. सिंचनाच्या क्षेत्रातदेखील या सरकारने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मध्यंतरी जे काही महाविकास आघाडीचं सरकार होते. या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली नाही. त्यामुळे सिंचनाचे काम पूर्णपणे ठप्प होते. या सरकारमध्ये 145 प्रकल्पांना त्याठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. ज्यामुळे 22 लाख 73 हजार हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल. नदीजोड प्रकल्प वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प 90 हजार कोटी रुपयांचा, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आपण केला. त्यामुळे यातील कुठलीही योजना केवळ कागदावरच नाही. अशाप्रकारे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं असं काम या सरकारने दोन - अडीच वर्षामध्ये केलेलं आहे. वेगवेगळ्या घटकांना आपल्या सरकारने दिलासा दिला. सगळ्या घटकांना भरघोस अशाप्रकारची वाढ देवून त्यांच्या ही जीवनामध्ये परिवर्तन करण्याचे काम केलं. वेगवेगळं जे समाज आहेत त्यांच्यासाठी आपण महामंडळं तयार करुन आणि त्या माध्यमातून लक्षित घटक म्हणून त्यांच्याकडे आपल्याला कसं लक्ष देता येईल हा प्रयत्न केला. मध्यंतरी जे अडीच वर्षाचं सरकार होते त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांना कुलूप लावलेलं होते. आणि पहिल्यांदाच पत्रकार आणि वृत्तपत्रविक्रेता यांचाही विचार या सरकारने केलेला आहे. तसेच वाढवण सारखे बंदर हे महाराष्ट्राला पुढचं 25 - 30 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची अर्थव्यवस्था हे वाढवण बंदर चालेल.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आमचा विरोधी पक्ष एकीकडे टीका करतो लाडकी बहिणचे पैसे देणार कुठून? मुलींना मोफत शिक्षणाचे पैसे देणार कुठून? सरकारजवण पैसे नाही आहेत आणि दुसरीकडे त्यांचे नेते म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही पंधराशेचं दोन हजार करु, आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करु. विरोधकांनी पहिलं हे ठरवलं पाहिजे की, सरकारकडे या योजना चालवायला पैसे आहेत की नाही आहेत. जर पैसे असतील तर पुढची कर्जमाफी ते करु शकतील. आम्ही तर ज्या योजना सांगितलेल्या आहेत आणि यापुढेही काही योजना आम्ही आमच्या जाहीरनाम्यात घोषित करणार आहोत. लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे की, काँग्रेस पक्षाचं नेते हे कोर्टामध्ये लाडकी बहिण योजना बंद करण्याकरता पोहचले आहेत. अर्थात त्यांना यश मिळालेलं नाही. उद्धवजींनी तर जाहीर केलं आहे की, आमचं सरकार आल्यानंतर महायुती सरकारच्या सगळ्या योजना आम्ही बंद करणार. त्यांचं सगळं निर्णय आम्ही उलट करणार. जसं अडीच वर्ष आधीच्या महायुतीच्या सरकारचे सर्व निर्णय बंद करुन महाराष्ट्राला कुलूप बंद करुन यांनी ठेवलं होते तसेच पुन्हा स्थगिती सरकार आणून महाराष्ट्राला कुलूप बंद करण्याचे यांचा प्रयत्न आहे तो कधीही यशस्वी होणार नाही. अनेक आरोप हे लोक लावत आहेत पण कायदा सुव्यवस्थेवर बोलत असताना त्यांनी आरसा देखील पाहिला पाहिजे. ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला, ते आता आम्हाला याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सांगता आहेत.

देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर ज्यांचे पोलीस बॉम्ब ठेवत होते आणि ते उघडकीस येऊ नये म्हणून पोलीसांनीच हत्या केली ते आता आम्हाला सांगता आहेत कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल. राज्य सरकारने कुठलीही घटना घडल्यानंतर तात्काळ कारवाई केलेली आहे आणि आरोपींना पकडलं आहे. या सरकारने अतिशय गतीने काम केलेलं आहे. महाराष्ट्र वेगाने प्रगतीकडे चाललेला आहे. देशाच्या 52 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते आणि हे म्हणतात गुंतवणूक गुजरातला चालली आहे. मला असं वाटतं गुजरातचं खरं अ‌ॅम्बेसिटर जर कुणी असतील तर ते महाविकास आघाडीचं आहेत. महाराष्ट्र पुढे असून यांना पुढं असलेला महाराष्ट्र दिसत नाही हेच रोज जगाला सांगतात गुजरात पुढे आहे. मी या ठिकाणी सांगतो, महाराष्ट्र पुढे आहे, महाराष्ट्रच पुढे राहिल. महाराष्ट्राला कुणी मागे टाकू शकत नाही. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com