साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."
Devendra Fadnavis Satara Speech : २०१४ ला सरकार आल्यानंतर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्पाची कामे आम्ही केली. मोदींनी या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला. सर्व भागात योजना बंद पडल्या होत्या. पण राज्यात आपलं सरकार आल्यावर या सर्व सिंचन प्रकल्पांना आम्ही भरघोस निधी दिला. त्यामुळे आज एक एक प्रकल्प पूर्णत्वाला जात आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागही आज जलमय होत आहे. उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली आहेत, ती कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ही सर्व कामे होतीलच. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभेत बोलते होते.
जनतेला संबोधीत करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. पुढचे पाच वर्ष देश कुणाच्या हातात सुरक्षीत असेल, पुढचे पाच वर्ष देशाला विकासाकडे कोण घेऊन जाईल, जनसामान्यांच्या आशाअपेक्षा कोण पूर्ण करेल, यासाठी नेता निवडण्यासाठी ही निवडणूक आहे. देशात दोन वेगवेगळे धृव तयार झाले आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत, मोदींच्या सोबत महायुतीचे सर्व पक्ष आहेत. त्या महायुतीचे नायक नरेंद्र मोदी आहेत. दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधींसोबत २४ पक्षांची खिचडी आहे. त्यांच्यात कुणी कुणाला नेता म्हणायलाच तयार नाहीय. आपली विकासाची ट्रेन आहे. मोदी विकासाच्या ट्रेनचं इंजिन आहेत. याला वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहेत.
या डब्ब्यांमध्ये दिनदलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांक, भटके, विमुक्त, ओबीसी, सर्व समाजाच्या लोकांना आपल्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा आहे. पण दुसरीकडे डब्बेच नाही आहेत. सर्व इंजिन आहेत. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे. शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे. उद्दव ठाकरे, ममता बॅनर्जी, लापूप्रसाद यादवांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे. मुलायम सिंग यांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे. स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. त्यांच्याकडे डब्बे नाही आहेत. त्यांच्याकडे फक्त इंजिन आहे.
राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना जागा आहे. तुमच्यासाठी जागा नाही. शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेंना जागा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे. यांचं इंजिन हालत नाही, डुलत नाही आणि चालतही नाही. यांचं इंजिन ठप्प पडलेलं आहे. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी देशात क्रांती घडवली. दहा वर्षात क्रांती करणारं मोदी मॉडेल नक्की काय आहे, असं विदेशातील लोक विचारतात. देशात दहा वर्षात २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं.
देशात २० कोटी लोकांना पक्क घर मिळालं. देशात दहा वर्षात ५० कोटी महिलांना गॅस सिलिंडर मिळालं. ६० कोटी लोकांच्या घरी शुद्ध पाणी पोहोचवलं. ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिलं आणि मोदींच्या माध्यमातून पुढचे वर्ष हे मोफत रेशन देण्याचं काम होणार आहे. महाराष्ट्राने बाळासाहेब देसाई यांना लोकनेते हा बहुमान दिला. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. बाळासाहेब देसाई महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि महाराष्ट्र उभा करण्यात अग्रणी नाव असलेले लोकनेते आहेत.
त्यांना पद्मपुरस्कार मिळवून देण्यासाठी मी स्वत: केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे. या संपूर्ण डोंगराळ भागातील विकासाचा विचार त्या काळात त्यांनी केला. कितीही राजकीय वादळं आली तरी लोकांचं प्रेम देसाई कुटंबावर राहिलं, ही त्यांची पुण्याई आहे आणि उदयनराजे हे काम पुढं नेत आहेत, याचा मला अतिशय आनंद आहे. उदयनराजेंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी पूर्ण केल्या आहेत. ते माझे मित्र आहेत. तुम्ही सांगितलं, म्हणजे कामगिरी फत्ते झाली, असंही फडणवीस म्हणाले.