"महाराष्ट्र इथून सुरु होत असेल, तर या जिल्ह्याचा..."; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Gadchiroli District : गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही. गडचिरोली हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्र इथून सुरु होतो. महाराष्ट्र इथून सुरु होत असेल, तर या जिल्ह्याचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या विकासाचा प्रयत्न मी आणि एकनाथ शिंदे यांनी सातत्याने केला. मोबाईल कनेक्टिविटी असले, रस्त्यांची कनेक्टिविटी असेल, पुलांचं बांधकाम, वेगवेगळ्या कम्युनिकेशनच्या सिस्टम केंद्र सरकारच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात उभं करण्याचा प्रयत्न केला. याची गती कुठे कमी आहे तर कुठे जास्त आहे. पण याची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली आहे. या माध्यमातून हा संपूर्ण जिल्हा कनेक्टेड करण्याचा प्रयत्न करत आहोत. जोपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचणार नाही, तोपर्यंत योजना पोहोचणार नाहीत, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या सत्कार सोहळ्यात केलं.जोपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचणार नाही, तोपर्यंत योजना पोहोचणार नाहीत, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या सत्कार सोहळ्यात केलं.
फडणवीस पुढे म्हणाले, एक रस्ता जेव्हा गावात जातो, त्यावेळई त्या गावात शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी पोहचतात. गावातल्या लोकांना रोजगाराची संधीही त्याच रस्त्यामुळे मिळते. अशा प्रकारच्या सर्व कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत, तरुणाच्या हाताला काम मिळावं, त्यांना प्रशिक्षण मिळावं, या संधी त्यांना याच जिल्ह्यातून मिळाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरु केला आहे. खूप मोठ्या प्रमाणात ओद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक गडचिरोलीत येत आहे. कालच्या बैठकीत प्रकल्पांच्या संदर्भात चर्चा झाली.
माओवाद कमी झाल्यानंतर जो उद्योजक आहे, त्यालाही असं वाटतंय की, आपण इथे उद्योग सुरु केला पाहिजे. त्याच्याही मनात सुरक्षिततेची भावना तयार झाली आहे. त्यामुळे आमच्या तरुणाईच्या हाताला काम हे मिळालं पाहिजे, असा आमचा प्रयत्न याठिकाणी सुरु आहे. मुला-मुलींकरता खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी गडचिरोलीत आपण तयार करणार आहोत. सातत्याने माओवादी प्रचार राहिला. विशेषत: आदिवासी बांधवांमध्ये राहिला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौपदी मुर्मूंसारख्या एका सक्षम आदिवासी महिला राष्ट्रपती पदासाठी मदत करून त्यांना राष्ट्रपती केलं. त्याच माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी संकेत दिला की, आमचे आदिवासी, त्यांची संस्कृती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्या संदर्भात कोणतीही छेडछाड होणार नाही. ज्यांची प्राचिन संस्कृती आहे, ती तशीच अबाधित राहिली पाहिजे.
आदिम जमातींसाठी मोदींच्या नेतृत्त्वात २४ हजार कोटी रुपयांची योजना सुरु केली. या जमातींपर्यंत विकास पोहोचला नव्हता, आज मोदींच्या माध्यमातून तो विकासही या ठिकाणी होत आहे. या विकासाच्या प्रक्रियेतून खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसाला मुख्य धारेत आणण्याचं काम आपण करतोय. ज्या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे, त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे झालं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे, असंही फडणवीस म्हणाले.