दिल्लीतल्या मद्यविक्रेत्यांनाही ED, CBI कडून धमक्या; मनिष सिसोदियांचे आरोप
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी आज भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दुकानदार, अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप त्यांनी आज केला आहे. दिल्लीतील कायदेशीर दारूची दुकानं बंद व्हावीत आणि अवैध दुकानांमधून पैसा कमवावा, अशी त्यांची इच्छा आहे. आम्ही नवीन मद्य धोरण बंद करण्याचा निर्णय घेतला असून, सरकारी दारू दुकानं सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सिसोदिया यावेळी बोलताना म्हणाले, आम्ही भ्रष्टाचार रोखण्यासाठी नवीन मद्य धोरण (Delhi News Liqour Policy) आणलं आहे. यापूर्वी 850 दारूच्या दुकानातून सरकारला सुमारे 6,000 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. मात्र नवीन धोरणानंतर आमच्या सरकारला तेवढ्याच दुकानांमधून 9 हजार कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे .
भाजपवर निशाणा साधत मनीष सिसोदिया म्हणाले, आज मी दोन राज्यांच्या मद्य विक्रीच्या धोरणाची वस्तुस्थिती समोर ठेवतोय. गुजरातमध्ये खुलेआम दारू विकली जाते आणि भाजपचे लोक दारू बनवतात आणि विकतात. बनावट दारू पिऊन लोक मरत आहेत. गुजरातमध्ये हे मॉडेल लागू करण्यात आलं आहे. सिसोदिया पुढे म्हणाले की, 2021-22 चं मद्य धोरण दिल्लीत आणलं होतं. यापूर्वी मोठा भ्रष्टाचार झाला होता, त्यांनी त्यांच्या मित्रांना खासगी दुकानं दिली होती. परवाना शुल्कात कोणतीही वाढ केली नव्हती. यापूर्वी दिल्लीत 850 दुकाने होती, ज्यातून 6000 कोटींचा महसूल मिळत होता. मात्र नवीन धोरणामुळे सरकारचं उत्पन्न दीड पटीने वाढलं असतं, त्यामुळे नवीन धोरण फसण्यास सुरुवात झाली. ईडीच्या माध्यमातून मद्यविक्रेत्यांना धमकावण्यात आलं. त्यामुळे अनेकांनी दुकानं सोडलीत. आज दिल्लीत फक्त 468 दुकानं आहेत.
मनीष सिसोदिया म्हणाले की, दिल्लीत उत्कृष्ट शाळा बांधल्या गेल्या आहेत. भाजपने याआधीही तपास केला, परंतु काहीही सापडलं नाही. लोकायुक्तांच्या चौकशीवर सिसोदिया म्हणाले की, अधिकारी आणि दुकानदारांना ईडी आणि सीबीआयकडून धमक्या आल्या आहेत. अनेक दुकानदारांनी दुकानं सोडली. ईडी आणि सीबीआयच्या धमक्यांमुळे सर्व अधिकाऱ्यांनाही घाबरवलं आहे. रिकाम्या झालेल्या दुकानांचा पुन्हा लिलाव करण्यास कोणीही अधिकारी तयार नाहीत.
सिसोदिया म्हणाले की, गुजरातप्रमाणेच दिल्लीतही भाजपला बनावट दारू विकायची आहे. गुजरातप्रमाणेच दिल्लीतही बनावट दारूमुळे लोकं मरायला सुरुवात होईल. आम्ही ते होऊ देणार नाही. त्यामुळे आता दिल्लीतील सरकारी दुकानातून दारू विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक तारखेपासून दिल्लीत फक्त सरकारी ठेके असतील.