संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर केसरकरांची प्रतिक्रिया,म्हणाले..
शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर 100 दिवसांनतर जामीन मंजूर झाला असून त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते सीबीआयच्या कोठडीत होते. दरम्यानच्या काळात राऊतानी अनेकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता पंरतू, प्रत्येकवेळी पीएमएलए न्यायालयाकडून राऊतांचा अर्ज फेटाळण्यात येत होता. मात्र काल राऊतांना कारागृहातून सुटका मिळाली आहे. संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि विधानसभा सदस्य दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांना शुभेच्छा देत केसरकर म्हणाले की,"आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो आणि राऊतांना जामीन मिळाल्याबाबत त्यांचं स्वागत करतो. राऊतांशी आमचा कुठलाही वैयक्तिक वाद नाही. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून चांगली काम घडो ही सदिच्छा."
"संजय राऊत चुकीचं बोलले असतील तर त्यांना त्यापद्धतीनं उत्तरं दिली जातात. ते चांगलं बोलले तर, त्याचं समर्थनही केलं जातं. ज्यावेळी हे पथ्य पाळलं जातं, त्यावेळी व्यक्तिगत संबंधांमध्ये कुठेही दुरावा निर्माण होत नाही. त्यामुळे त्यांनी टीका केली तर त्यांच्या टीकेचं स्वागतच आहे. कारण टीकेवर आपल्याला उत्तरं देता येतात, आपला कारभार सुधारतो. पण टीका करत असताना योग्य त्या भाषेत टीका करावी, अशी अपेक्षा असते", असही केसरकर म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, "राज्यात नवं सरकार बनलं आहे. त्यांनी काही निर्णय चांगले घेतले असून त्याचं मी स्वागत करतो. विरोधासाठी विरोध करणार नाही. राज्य, देश व जनतेसाठी चांगले निर्णय फडणवीसांनी घेतले आहेत. आमच्या सरकारने म्हाडाकडून अधिकार काढले होते. ते मला पटलं नव्हतं. परंतु, नव्या सरकारने म्हाडाला ते अधिकार परत दिले हा चांगला निर्णय आहे.