IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?
आयपीएल २०२४ मध्ये अटीतटीचे रंगतदार सामने होत आहेत. परंतु, आता दुसऱ्या टप्प्यातील सामने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. कारण प्ले ऑफच्या शर्यतीत सर्वच संघांची रस्सीखेच सुरु आहे. परंतु, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांना मोठा धक्का बसला आहे. या संघांचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि मयंक यादव दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. हे दोन्ही गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने प्ले ऑफ आधी सीएसके आणि लखनऊच्या अडचणी वाढल्या आहेत.
चेपॉक स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज विरोधात झालेल्या सामन्यात दोन चेंडू टाकल्यानंतर दीपक चहरला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने मैदानात पुनरागमन केलं नव्हतं. आता चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी दीपक चहरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. ते म्हणाले, दीपक चहरला दुखापत झाली आहे. मला असं वाटत नाही की, तो या आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे. परंतु, त्याचं खेळणं आता कठीण आहे. धरमशालामध्ये होणाऱ्या पुढील सामन्यात तो खेळणार नाही. तो चेन्नईतच आहे. त्याच्या मेडिकल रिपोर्टचा वाट पाहत आहोत.
तसंच लखनऊ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादवही मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. मुंबईविरोधात झालेल्या या सामन्यात मयंकने १९ वं षटक टाकलं होतं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने मुंबईचा फलंदाज मोहम्मद नबीला बाद केलं होतं. परंतु, विकेट मिळाल्यानंतर मयंकला दुखापत झाल्याचं समोर आलं आणि तो ड्रेसिंग रुममध्ये परत गेला.
CSK आणि LSG चं होणार मोठं नुकसान ?
दीपक चहर आणि मयंक यादवच्या दुखापतीमुळं चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. हे दोन्ही खेळाडू संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. या खेळाडूंच्या अनुपस्थित संघांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतो. चेन्नई आणि लखनऊ अजूनही प्ले ऑफसाठी क्वालिफाय झालेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही संघांसाठी पुढील सामने खूप महत्त्वाचे आहेत.