समीर वानखेडेंना तात्पुरता दिलासा, अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय कायम
आर्यन खान क्रूझ ड्र्ग्ज प्रकरणात आयआरएस अधिकारी आणि एनसीबीचे माजी झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. समीर वानखेडे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. 8 जूनपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे.
सीबीआयला 3 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले, त्यानंतर 5 दिवसांनी, म्हणजेच 8 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून 25 लाख रुपये मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने (CBI) केला आहे. तर केससंदर्भातले पुरावे माध्यमांमध्ये शेअर न करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.
दरम्यान समीर वानखेडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. मागचे दोन दिवस समीर वानखेडे यांची सीबीआयकडून दररोज पाच तास चौकशी झाली आहे. हायकोर्टाने दिलेल्या निर्देशांचं पालन करत दोन दिवस सीबीआय अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. या दोन दिवसातील चौकशीचा अहवालही सीबीआयने हायकोर्टात सादर केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर समीर वानखेडेंना हायकोर्टाने अटकेपासून असलेलं संरक्षण कायम ठेवलं आहे.