सिलिंडर स्फोटामुळे हादरली डोंबिवली, तीन जण जखमी
कल्याण (अमजद खान) - घरात सिलिंडरचा गॅस लिकेज होऊन झालेल्या स्फोटात तीन जण जखमी झाल्याची घटना डोंबिवली पश्चिमेतील गायकवाड वाडी परिसरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या दोन घरांचेही नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Cylinder explosion shakes Dombivli, three injured)
डोंबिवली पश्चिमेतील गायकवाड वाडी परिसरात पारसनाथ ही इमारत आहे. तळ मजल्यावर मनिषा मोरवेकर या राहतात. आज रात्री पावणो आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरात अचानाक स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की, घराचे दोन्ही दरवाजे उडाले. मनिषा या जखमी झाल्या. याचवेळी जिन्यावरुन वरती जाताना उरशीला लोढिया आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा रियांश हा देखाल जखमी झाला.
उरशीला या आपल्या मुलाला शाळेतून घेऊन घरी परतत होत्या. स्फोटामुळे आजूबाजूच्या दोन घरांना मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूचा परिसर हादरुन गेला. फायर ब्रिगेड आणि विष्णूनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिलिंडरचा पाईप लिकेज असल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. स्फोटाचे मुख्य कारण हे तपासा अंती समोर येणार आहे.