Abu Azmi Press Conference
Uran Murder Casegoogle

Uran Murder Case: गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराचा धर्म नसतो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे - अबू आझमी

उरणमध्ये २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेबाबत अबू आझमी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Uran Crime News : रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. सातरहाठी गावात राहणाऱ्या या तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या प्रकरणावर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. या प्रकरणातील आरोपी मुस्लीम असल्यानं त्याला धर्माशी जोडून लव्ह जिहादचे नाव देण्यात आलं आहे. उरण प्रकरणात मुस्लीम आरोपी म्हणून आक्रोश कशाला? गुन्हेगाराला धर्म नसतो हे भाजप विसरलं का? असा थेट सवाल आझमी यांनी भाजपला केला आहे.

अबू आझमी काय म्हणाले?

गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराचा धर्म नसतो, त्याला त्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे. उरणमध्ये, एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हा गुन्हा करणारी व्यक्ती मुस्लिम असल्याने त्याला धर्माशी जोडून लव्ह जिहादचे नाव देण्यात आले. पण दुसरीकडे शिळफाट्याच्या बलात्कार प्रकरणात धर्म दिसत नव्हता का? गुन्हे करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे, पण गुन्ह्यांवर निवडक आक्रोश का? असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला आहे.

अबू आझमी पुढे म्हणाले, मुंबईतील धारावी येथे ज्या प्रकारे अरविंद वैश्य नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने या हत्येला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न विश्व हिंदू परिषद आणि सोशल मीडियातील समाजकंटकांकडून केला जात आहे. परंतु, सदर घटनेबाबत पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली.

विविध सण उत्सव आता सुरू होणार आहेत आणि निवडणुकाही जवळ आल्या आहेत, अशा परिस्थितीत पोलिस आणि प्रशासनाने गुन्हेगारीवर कडक पकड ठेवायला हवी आणि धार्मिक रंग देऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवरही नजर ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे की, गुन्हेगारीला धार्मिक रंग देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच राज्यातील गुन्हेगारीवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना पोलिसांना द्याव्यात आणि विशेषतः मुंबई शहरात सूचना देण्यात याव्या, असंही अबू आझमी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com