“तुमच्या धमक्यांना भीक घालणारी…”शिवसेनेचा हल्लाबोल
सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात अनेकजण एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नुकतेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले होते की, देशातून अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिवसेना संपण्याच्या मार्गावर असून, इतर प्रादेशिक पक्षही लयाला जातील आणि फक्त भाजपा टिकेल. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
“दुसरे म्हणजे संपूर्ण जग मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करीत होते. गुजरातमधील दंगलीचे निमित्त करून मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते. तेव्हा ‘राजधर्म वगैरे ठेवा बाजूला, हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उठवू नका,’ असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत?” असा सवालच थेट शिवसेनेनं विचारला आहे.
तसेच “प. बंगाल, केरळ, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा राज्यांत प्रादेशिक पक्ष मजबूत स्थितीत आहेत. शेवटी ही प्रादेशिक अस्मिता आहे व ती राहणारच. सगळेच काही तुमच्या मागे फरफटत जाणार नाहीत. पंजाब व दिल्लीत ‘आप’चे राज्य आहे. आम आदमी पक्ष आता नड्डांच्या हिमाचलात घुसला आहे. त्यामुळे हिमाचलात नड्डांची दमछाक होईल. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढता येत नाही म्हणून त्यांनी ‘ईडी’ वगैरेंचा धाक दाखवून शिवसेना फोडली व हे फुटक्या कवडीचे फुटीर लोक खिशात ठेवून ते शिवसेनेस आव्हान देत आहेत. तुमच्या खिशातले फुटक्या कवडीचे लोक संपतील, पण बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा आकाशाला गवसणी घालेल. तुमच्या धमक्यांना भीक घालणारी शिवसेना नाही,” असं शिवसेनेनं म्हटले आहे. यासोबतच “भाजपाचे वाढणारे बळ कृत्रिम आहे. इतर पक्षांचे सदस्य व नेते फोडण्यासाठी भाजपा फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे, असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे. तरीही या सगळ्याला भीक न घालता प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत व लढत आहेत. कारण त्यांची नाळ पक्की आहे. जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपाच राहील व बाकीचे सगळे संपतील. मऱ्हाटीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. दुसरे असे की, भाजपाने खोटा खोटा का होईना, गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही,” असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.
“भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ही व्यक्ती इतरांच्या तुलनेत बरी आहे, असा एकंदरीत समज होता. एक तर ते हिमाचलसारख्या शांत, थंड प्रदेशातून आलेले आहेत व अ. भा. विद्यार्थी परिषदेपासून ते समाजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे लोकशाहीचे भान त्यांना असावे, पण अखेर नड्डाही सब घोडे बारा टके या हिशेबानेच बोलू लागले आहेत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. “नड्डा यांनी आता सांगितले आहे की, देशात फक्त भाजपाच टिकेल. शिवसेनेसह प्रादेशिक पक्ष संपतील. नड्डा यांचे विधान अहंकार व गर्वाने फुगलेले आहे. नड्डा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला म्हणून सुरुवातीलाच सांगायला हवे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. आज संबंधात दुरावा नक्कीच आहे, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात,” असा हल्लाबोल शिवसेनेचा अग्रलेख सामनातून करण्यात आला आहे.