Corona Virus Alert : चीनमधून आग्र्यात आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देश अलर्ट झाले असून कोविड प्रतिबंधात्मक उपाय करत आहेत. भारतातही सर्व राज्यांना कोरोना अॅडव्हायजरी जारी केली आहे. अशातच चीनमधून परतलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह सापडला आहे. यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे.
चीनमधून दोन दिवसांपूर्वी आग्रा येथे परतलेल्या 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. ही व्यक्ती 23 डिसेंबर रोजी चीनमधून दिल्लीमार्गे आग्रा येथे परतली होती. त्यानंतर त्याची खासगी लॅबमध्ये चाचणी झाली असता अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्याला घरातच आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.
आग्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी रविवारी ही माहिती दिली. त्या व्यक्तीचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी लखनऊला पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, त्याच्या कुटुंबातील सदस्यांची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्यास सांगितले आहे.
आग्रा येथील आरोग्य विभागाने परदेशी पर्यटकांची तपासणी सुरू केली असून ताजमहाल, आग्रा किल्ला आणि अकबराच्या मकबऱ्यावर नमुने गोळा करणे सुरू केले आहे. याशिवाय आग्रा विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि आंतरराज्यीय बस टर्मिनल (ISBT) येथेही चाचण्या करण्यात येत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, चीनसह काही देशांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना केंद्राने संसर्गविरोधी उपायांना गती दिली आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली जाईल, असे केंद्राने सांगितले होते आणि राज्यांना 27 डिसेंबर रोजी 'मॉक ड्रिल' आयोजित करण्यास सांगितले होते. यात वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन संयंत्रांसह आरोग्य सुविधांची तयारी केली होती.