Odisha Train Accident: ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचा भीषण अपघात; 233 प्रवाशांचा मृत्यू, 900 जण जखमी
ओडिशा : Odisha Train Accident: बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमी प्रवाशांना सोरो आणि गोपालपूर रुग्णालयात उपचारांकरीता हलवण्यात आले आहे. गंभीर जखमी प्रवाशांना अतिदक्षता विभागात पाठवले जाईल, असे ओडिशाच्या मुख्य सचिवांनी सांगितले.
या भीषण अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण 3 गाड्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मृतांचा आकडा आणथी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधी हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांवर आदळली आणि नंतर कोरोमंडल एक्स्प्रेस मागून आली, त्यामुळे भीषण अपघात झाला. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर गंभीर जखमींना 2 लाखांचं सहाय्य केलं जाणार आहे. NDRFच्या चार तुकड्या, 30 डॉक्टर, 200 पोलीस कर्मचारी आणि 60 रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत.