सत्यजित तांबेना काँग्रेस पाठिंबा देणार नाही – नाना पटोले
नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्याने काँग्रेसचीच कोंडी झाली. येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी सकाळी दिल्लीतून करण्यात आली, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. तांबे यांनी अर्ज सादर केला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष चांगलाच नाराज झाला असल्याचे समजते.
याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, “भाजपने भय दाखवून दुसऱ्यांची घरं फोडणं, दुसऱ्यांची लोकं आपल्या ताब्यात घेणं हा नवीन व्यवसाय या लोकशाहीच्या व्यवस्थेत सुरु केलेला आहे. आणि ते लपलेलं नाही”,भाजप लोकशाहीचा चुराळा करायला निघालेली आहे. त्यांना आज या सगळ्या गोष्टी सोप्या वाटत आहेत. पण पुढे त्यांचं जेव्हा घर फुटेल तेव्हा त्यांना दु:ख कळेल” असे ते म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, सत्यजित तांबेना काँग्रेस पाठिंबा देणार नाही. हायकमांडच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. आम्ही सुधीर तांबेंना तिकीट दिली होती. सुधीर तांबेंनी पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. हा काँग्रेससाठी धोका आहे. बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही. असे नाना पटोले म्हणाले.