50 कोटी देऊन अमरावतीचा निकाल फिरवण्याची तयारी, नाना पटोले यांचा गौप्यस्फोट
राज्यात सध्या राजकीय घडामोडी सुरु असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं गौप्यस्फोट केला आहे. अमरावती निवडणुकीत 50 कोटी रुपये देऊन निकाल फिरवण्यात येणार होता, पण मी कमिशनरला इशारा दिला आणि ते टळलं असा गौप्यस्फोट मुंबईत सुरु असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या परिषदेत त्यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या अमरावती विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांनी विजय प्राप्त केला आहे.
नेते नाना पटोले म्हणाले की, अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या धीरज लिंगाडे यांनी सर्वाधिक मतं घेतली. पण त्यांना विजयी घोषित करण्यात येत नव्हतं. त्याची मतमोजणी 30 तासांपर्यंत सुरू होती. त्यावेळी मला आयबीमधून एका मित्राचा फोन आला. त्याने सांगितलं की अमरावतीचा निकाल बदलण्याची तयारी सुरू असून त्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम 100 कोटींपर्यंतही जाऊ शकते. हे ऐकल्यानंतर मी डिस्टर्ब झालो, मला रात्रभर झोप आली नाही.
ते पुढे म्हणाले, आयबीमधून मित्राचा कॉल आल्यानंतर मी लागोलाग कमिशनरना कॉल केला आणि त्यांना असं काही केल्यास नोकरी घालवेन, तुझ्या खानदानापर्यंत जाईन असा इशारा दिला. मी धीरजला सांगिलं की प्रमाणपत्र घेऊन बाहेर पड. अशी दादागिरी करावी लागते. ही निवडणूक जिव्हारी लागली म्हणून मी डिस्टर्ब झालो होतो. मी पूर्ण रात्र जागे होतो. सगळा राग होता तो निघाला. आज मात्र आनंद आहे.
काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले असून त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा 3 हजार 368 मतांनी पराभव केला आहे. बाद फेरीच्या मतमोजणीअखेर धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 मते प्राप्त झाली, तर डॉ. रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली.