नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यातील वडेगाव येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. या दरम्यान नाना पटोले यांनी शेगावचे गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी पावसामुळे या ठिकाणी चिखल झाला होता. त्या चिखलात नाना पटोले यांचे पाय माखले गेले.
यावेळी एका कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले. हा पाय धुण्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाना पटोले इतक्या खालच्या लेव्हलला गेले आहेत. शेतकऱ्याकडून पाय धुवायला लावत आहेत. या महाराष्ट्रात देशाला अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला आहे. गुलामगिरीमध्ये जसा देश होता, इंग्रजांच्या काळात देश होता. पुन्हा हा इंग्रजांचा काळ काँग्रेसनं आणलेला आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, इंग्रजांच्या काळातली जी काय मानसिकता होती ती नाना पटोले यांनी स्विकारलेली आहे. नाना पटोलेंचा मी निषेध करतो. नाना पटोले यांनी आपल्या पदाचाही अपमान केला आहे. व्यक्ती म्हणून स्वत: त्यांनी आपला अपमान केला आहे. त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे की या पद्धतीने शेतकऱ्याकडून पाय धुवून घेणं, कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेणं आणि या पद्धतीचे नेतृत्व करणं हे शोभणारं नाही आहे. याचे आत्मचिंतन नाना पटोले यांनी केलं पाहिजे. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.