सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, "शरद पवार..."
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी विविध मतदारसंघात उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केलीय. सातारा लोकसभेच्या जागेबाबत अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीने सर्वात सक्षम आणि भक्कम उमेदवार द्यावा, असा आमचा सर्वांचा प्रयत्न सुरु आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाकडे आहे. त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे.
ते आमच्याशी चर्चा करत आहे. मुंबईच्या बैठकीत ही चर्चा झाली. इथेही चर्चा होत आहे. उमेदवारीबद्दल मी काहीही बोलणार नाही. बंदखोलीत झालेली चर्चा जाहीरपणे मांडता येणार नाही. आतापर्यंत कोणत्याही जातीवादी पक्षाचा उमेदवार यशस्वी झाला नाहीय. ही परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे, असंही चव्हाण म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, मागील निवडणुकीतले आकडे तुम्ही पाहिलेले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि एमआयएमला किती मते पडली? कुणी कुणाच्या जागा पाडल्या, यावरून स्पष्ट होतं.