फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान, म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे केलेल्या शपथविधीवर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर एकच राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु झाला. यावरच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झालेला नव्हता असे माझे मत आहे, असे थोरात म्हणाले आहेत.
बाळासाहेब थोरात म्हणाले, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणेज ते शरद पवार आहेत. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असता तर ते सरकार पडलेच नसते. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झालेला नाही, या मताचा मी आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले, काहीतरी वाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरे काहीही नाही. विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी वेगळे वाद निर्माण करायचे, हे भाजपाच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. भाजपाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे.
दरम्यान, फडणवीसांच्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी स्वत:वर उपचार करुन घ्यावे. ते जगातील दहावं आश्चर्य आहेत. फडणवीसांना अटकेची भीती का वाटत होती. अशी कोणती चूक त्यांनी केली होती. पवारांच्या सहमतीने पहाटेचा शपथविधी झाला असता तर सरकार कोसळलं नसते. विधान परिषदेच्या पराभवानंतर वैफल्यातून फडणवीस असे वक्तव्य करत आहेत. असे राऊत म्हणाले.