CM एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आणि खासदार घेऊन पक्षाबाहेर पडलेले शिंदे आता मुंबईतील दादरमध्ये आणखी एक शिवसेना भवन सुरू करणार आहेत. गेल्या पाच दशकांपासून शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेना भवनावर शिंदे दावा करतील, असं मानलं जात होतं. मात्र आता एकनाथ शिंदे दादरमध्ये आणखी एक शिवसेना भवन सुरू करणार असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमातून समोर येतंय. लवकरच ते याबाबतही पावलं उचलणार असल्याचं सांगण्यात येतंय.
एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचं दादरमध्ये मोठं कार्यालय हवं आहे. कारण त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडे कामं घेऊन येणारी हजारो लोक मुंबईत येत असतात. अशा हजारो नागरिकांना भेटण्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागात मोठ्या कार्यालयाची गरज असल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. त्यादृष्टीनं लवकरच पावलं उचलली जातील, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे.
शिवसेना शाखा, शिवसेना भवन, शिवसेना पक्ष हे सर्व शिवसेनेचं आहे. या प्रस्तावित नवीन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर म्हणाले. या कार्यालयाला काय नाव द्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असंही सदा सरवणकर यांनी सांगितलं.