Eknath Shinde
Eknath Shinde

"स्वप्नातही राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत", इंडिया आघाडीवर CM एकनाथ शिंदेंनी डागली तोफ

'नो लंके, ओन्ली विखे', असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी उमेदवारांवर चिमटा काढतानाच राहुल गांधीवरही सडकून टीका केली.
Published by :
Naresh Shende
Published on

Eknath Shinde On Rahul Gandhi : स्वप्नात जरी विचार केला, तरी राहुल गांधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही. या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त नरेंद्र मोदींना आहे. कारण त्यांनी आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलं आहे. मोदींनी देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. दूध पिणारा मुलगाही म्हणेल, अबकी बार ४०० पार आणि फिर एक बार मोदी सरकार. म्हणून नो लंके, ओन्ली विखे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी उमेदवारांवर चिमटा काढतानाच राहुल गांधीवरही सडकून टीका केली. ते महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या अहमदनगरच्या प्रचारसभेत बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले, इंडिया आघाडीच्या इंजिनमध्ये एकच माणूस बसतो. पण मोदींच्या इंजिनमध्ये अनेक डब्बे आहेत. सुजयलाही या डब्ब्यात बसवून दिल्लीला पाठवायचं आहे. गेल्या पन्नास वर्षात राहुल गांधींचं लॉन्चिंग झालं नाही. मोदींनीं तर इस्त्रोच्या माध्यमातून चांद्रयानचं चंद्रावर यशस्वी लॉन्चिंग केलं. राहुल गांधी देश कसा पुढे नेणार, राहुलला गरमी झाली की, थंड हवा खायला विदेशात जातो. मग उन्हात २४ तास काम करणारे प्रधानमंत्री मोदी पाहिजेत का थंड हवा खायला विदेशात जाणारे राहुल गांधी पाहिजेत, हे ठरवा. ड्रामा करुन लोक निवडून येत नाहीत. त्यासाठी काम करावं लागतं. लोकांच्या दुख:त सहभागी व्हावं लागतं. येत्या १३ मे ला मतदान आहे. सुजयच्या मतदानात आपण सर्वांनी सुजयचा मागचा लीड तोडून पुढं जायचं आहे.

कडाक्याच्या उन्हात आपण इतक्या मोठ्या संख्येत सुजय विखे पाटील यांच्या पाठिशी उभे राहिलात, याचा अर्थ सुजयचा विजय पक्का आहे. सुजय विखे एक तरुण युवानेता म्हणून काम करत आहे. लोकसभेतही अनेक प्रश्नांना त्याने वाचा फोडली आहे. सुजयचे पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी याचा वटवृक्ष केला. आता ती परंपरा सुजय पुढे नेत आहे. सुजयच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्याचा पराजय होणे अशक्य आहे.

विरोधकांच्या लंकेचं दहन करून सुजयला प्रचंड मताधिक्क्याने विजयी करायचं आहे. रावणरुपी लंकेचं दहन हनुमानजीने केलं. उद्या हनुमान जयंती आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या लंकेचं दहन करण्याचा संकल्प करा. मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे. सर्व गॅरंटी फेल झाल्या आहेत. एकच गॅरंटी चालली आहे, ती म्हणजे मोदी गॅरंटी. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची गॅरंटी आपण देशवासीयांनी घेतली आहे, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com