मनसे महायुतीत सामील होणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "राज ठाकरे..."
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जागावाटप आणि पक्षांच्या युतीसंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत तुफान चर्चा सुरु आहे. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत विचारलं असता, ते म्हणाले, "राज ठाकरे आणि आमची विचारधारा एकच आहे. आम्ही लोक एकाच विचारसरणीचे असल्याने योग्य निर्णय होईल."
मनसेबाबत प्रतिक्रिया दिल्यानंतर शिंदे यांना मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीबाबत विचारले असता ते म्हणाले, त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही न्यायाधीश शिंदे समिती गठीत केली. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण दिलं. या आरक्षणाचा जास्तीत जास्त लाक्ष मराठा समाजाच्या तरुणांनी घेतला पाहिजे.पोलिसांच्या भरती प्रक्रियेत आरक्षणाचा फायदा त्यांना होईल. कोर्टात काही लोक गेले होते, परंतु, कोर्टाने त्यांना स्थगिती दिली नाही. सरकारने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट फाईल करुन ठेवलं आहे.
कुणबी, सग्यासोयऱ्यांच्या अध्याधेशाला ८ लाख हरकती आल्या आहेत, त्याची छाननी सुरु आहे. आंदोलन केले, सभा घेतल्या, रॅली काढल्यामुळे काही गुन्हे दाखल झाले, रास्ता रोकोमुळे काही गुन्हे दाखल झाले. पहिल्या टप्प्यात त्याची छाननी सुरु आहे. सरकार पूर्ण सकारात्मक आहे. जे गुन्हे गंभीर स्वरुपाचे नाहीत, सरकारने ते काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्याआधीच घेतला आहे. ज्या गंभीर गुन्ह्यात जीवितहानी, वित्तहानी, मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, त्यांना दुसऱ्या प्रक्रियेत बसवून त्यातून सकारात्मक मार्ग काढणार आहोत, असंही शिंदे म्हणाले.