शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाच्या शपथविधीची तारीख ठरली?
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर निश्चित झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे. आतापर्यंत १७ किंवा १९ जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती. मात्र सर्व चर्चांना पुर्णविराम लागला असून, नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात दहा ते बारा जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. आतापर्यंत मंत्रिमंडळाचा निर्णय होऊ न शकल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावर होते.
मंत्रिमंडळ विस्ताराची योजना दोन टप्प्यात
एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारचा हा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचं सांगण्यात येतंय. यामध्ये पहिल्या टप्प्यातील शपथविधी पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे असं ठरल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी भाजपचे सहा आमदार आणि शिंदे गटाचे सहा आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. त्याचवेळी या यादीत शिंदे गटातून कोणाचा समावेश होतो, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
...म्हणून 20 तारीख निवडली
17 किंवा 19 जुलैला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्व आमदारांना मुंबईत यावं लागेल. त्यामुळे आमदारांना मतदारसंघातून पुन्हा पुन्हा मुंबईत यावं लागू नये यासाठी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.