"देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा सुरु झाली, पण..."; CM एकनाथ शिंदेंनी विरोधकांना दिला इशारा
CM Eknath Shinde Speech: सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही २४ तास काम करतो. हात दाखवा आणि गाडी थांबवा, असं म्हणतात. तसच मुख्यमंत्र्यांनाही हात दाखवतात आणि गाडी थांबते. शेवटी हे आपल्यातलं सरकार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही कामातली माणसं आहेत, हा लोकांना विश्वास आहे. सर्वसामान्यांना भेटणारी आणि संवाद साधणारी माणसं आहेत. तेव्हाच अशाप्रकारचे लोक जवळ येतात. घरात बसून सर्व गोष्टी होत नाही. आम्ही फेसबूक लाईव्ह नाही, फेस टू फेस काम करतो. लोकांमध्ये जावं लागतं. सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे काही लोकांना पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे देवेंद्रजींनादेखील संपवण्याची भाषा सुरु झाली. पण चांगल्या योजनांचा घाव त्यांच्या वर्मी लागला आहे. घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करु नये. देवेंद्रजी तुम्ही चांगलं काम करत आहात. आख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे. हे लक्षात ठेवा, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
आम्ही अनेक योजना सुरु केल्या. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल कसा होईल, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कसा होईल, यासाठी हे सरकार आहे. त्यांचं जीवन सुखी होण्यासाठी आमचा आटापीटा आहे. या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झालेला पाहायचा आहे, बाकी आम्हाला काहीच नको. समाधानी झालेला पाहायचा आहे. अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध कार्यक्रम आणि उपक्रमाने आपण सुरु करत आहोत. अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी प्रवृत्त करणं हेच अण्णाभाऊंचं उद्दीष्ट होतं. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणलं.
हे सर्वसामान्यांचं सरकार अण्णाभाऊ साठे यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. आजचा दिवस आपल्यासाठी विशेष दिवस आहे. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्राचं आज उद्घाटनही केलं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाच्या विकास महामंडळाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज, विविध योजना, लाभार्थ्यांना कर्जाचं वितरणही आपण करत आहोत. महामंडळाच्या कर्जाच्या पोर्टलचं उद्घाटनही आपण केलं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.