महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत निती आयोगाच्या बैठकीत काय चर्चा झाली? CM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
CM Eknath Shinde Press Conference : निती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल शुक्रवारी दिल्लीला रवाना झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज निती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत निती आयोगाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत सविस्तर माहिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. प्रधानमंत्री मोदींनी महाराष्ट्राच्या विषयांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
जे प्रकल्प बंद पडले होते, ते सुरु केले. अटल सेतू, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, कोस्टल हायवे, बंद पडलेली मेट्रो सुरु केली. कारशेडचं काम पूर्ण होत आहे. हे प्रकल्प सुर असताना कल्याणकारी योजनाही सुरु केल्या. याबाबतही आम्ही निती आयोगाच्या बैठकीत माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्ण योजना, युवकांच्या रोजगारासाठी स्टायपंडचा विषय, हे आपल्या राज्यात पहिल्यांदा घेतलेले निर्णय आहेत. दूध, कापूस, सोयाबीन, कांद्याच्या विषयावर चर्चा झाली. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं धोरण केंद्र सरकारचं असलं पाहिजे. शेतकऱ्यांना फायदा होईल, अशाप्रकारचा निर्णय सरकारने घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
जे पाणी समुद्रात वाहून जातं, त्या पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. मराठवाडा वॉटर ग्रीड झाला पाहिजे. तो भाग दुष्काळमुक्त झाला पाहिजे. नाशिक-पुणे रल्वे, चिपळूण-कराड रेल्वे रखडली आहे, त्याबाबत चर्चा झाली. ठाणे मेट्रोबाबतही चर्चा झाली. बीपीटीच्या सहा एकर जागेचा योग्य वापर झाला पाहिजे. तेथील रहिवाशांचं पुनर्वसन झालं पाहिजे.
मरिन ड्राईव्हसारखी मोठी चौपाटी त्या ठिकाणी सुरु होऊ शकते. अनेक विषयांवर चर्चा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दुष्काळ हटवण्यासाठी अंतर्गत नदीजोड प्रकल्पाला महत्व दिलं पाहिजे. उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर इन्सेटिव्ह दिलं पाहिजे. उद्योजकांना सवलती दिल्या पाहिजे. उद्योग आले तर लोकांच्या हाताला काम मिळेल, अशाप्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मोदींनी दिला.