लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच CM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, "मोदींना तडीपार करण्याचा..."
Eknath Shinde Press Conference : कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंनी दहा वर्षात जे काम केलं, ते लोकांपर्यंत पोहोचलं. लोकांनी विकासाला मत दिलं आहे. त्यामुळे त्यांचाही मोठा विजय झाला आहे. त्यामुळं मी सर्वांचं अभिनंदन करतो. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचंही अभिनंदन करतो. कारण मोदी आता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणार आहेत. मोदींचं सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही महायुतीत त्यांना लवकरच पाठिंबा जाहीर करू. काही लोकांचा मोदींचा पराभव करण्याचा उद्देश होता. मोदी देशाचा विकास करण्याचा अजेंडा घेऊन निवडणूक लढत होते. पण विरोधकांना मोदींना हरवायचं आहे. मोदींना तडीपार करण्याचा विचार जे करत होते. या देशातील जनतेनं त्यांना उत्तर दिलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
शिंदे माध्यमांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. खूप मेहनत घेतल्यानंतर इतकं मोठं मताधिक्य मिळालं आहे. ठाणे लोकसभा शिवसेनेचा गड आहे. आनंद दिघे यांचा गड आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या या ठाणे लोकसभेवर प्रभाव आहे. विजय तर निश्चितच होता. लोकांनीही आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते नरेश म्हस्के विजयी झाले आहेत.
लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला आम्ही पात्र राहू. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विकास करू. या मतदारसंघातील कामे निश्चितपणे केली जातील. डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही कल्याणमध्ये मोठा विजय मिळाला आहे. त्यांनाही मोठं मताधिक्य मिळालं आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो. कल्याण लोकसभेच्या मतदारांचं आभार मानतो. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो.