सुरतला गेल्यापासून ते सरकार स्थापन होण्यापर्यंत...CM शिंदेंनी सगळंच स्पष्ट सांगितलं
Maharashtra Assembly : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीबद्दल सभागृहाला माहिती दिली. आपण आजपर्यंत आंदोलनं केली, निदर्शनं केली, वेगवेगळ्या प्रश्नांवरुन संघर्ष केला. शिवसेनेसाठी मी माझं आयुष्य खर्च केलं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माझा हा संघर्ष जवळून पाहिलं आहे. दिघे साहेब गेल्यानंतर सर्वांना वाटलं की शिवसेना ठाण्यातून संपून जाईल, मात्र मी दिघे साहेबांच्या पुण्याईमुळे आजही नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगर पालिका सगळीकडेच शिवसेनेची सत्ता आहे. आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीचं मतदान केलं, कोणतंच प्लॅनिंग न करता सुरतकडे निघालो. त्यावेळी नाकेबंदी करत आम्हाला रोखण्याचाही प्रयत्न झाल्याचं शिंदेंनी सांगितलं. मात्र आम्ही शिवसैनिक (Shiv Sena) आहोत, आम्हाला कुठून कसं निघायचं हे माहिती असल्याचं सांगितलं. तसंच आपण तिकडे येण्यासाठी कुणावरही बळजबरी केली नाही, ज्यांना परत यायचं त्यांना माणसं आणि विमान देऊन परत पाठवलं असं एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं की, अजित दादांची अन् माझी अंडरस्टॅंडींग होतं. ते माझ्या मंत्रालयाच्या सुद्धा बैठका घेतल्या, मी त्यांना कधी बोललो नाही. कारण तो माणूस काम करत होता असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं कौतूक केलं. माझ्या खात्यात सगळे हस्तक्षेप करायचे, माझ्यापेक्षा वरीष्ठ असल्यानं मी बोलू शकत नव्हतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आमच्यावर गद्दारीचा शिक्का लावू नका, आम्ही गद्दार नाही. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते. अजित दादांनी सांगितलं की, आमचाही विरोध नव्हता, तुमच्या पक्षाचाच त्या पदासाठी तुम्हाला विरोध होता. मी त्यानंतर पदाचा मोह सोडला आणि उद्धव साहेबांना म्हटलं तुम्ही पुढे चला आम्ही सोबत आहोत. आम्ही सत्तेसाठी नाही आलो, नाही तर एवढे मंत्री सत्ता सोडून आले नाही असं शिंदे म्हणाले. निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, ते अनेकदा मला सांगायचे, आपली नैसर्गिक युती भाजपसोबत आहे. ते सर्व आमदार माझ्याकडे तक्रारी करायचे, त्यानतंर मी पाच वेळा मी उद्धव ठाकरेंकडे बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पाचही वेळा आम्हाला अपयश आलं असं शिंदे म्हणाले.