सुरत, गुवाहाटी, गोवा ते मुंबई... अखेर एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेच
मुंबई : राज्यात मागच्या काळात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांपासूनच शिवसेनेमध्ये अस्वस्थतेच्या, नाराजीच्या लाटा आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर या लाटा एवढ्या तीव्र झाल्या की, यामुळे शिवसेना (Shiv Sena) फुटली आणि परिणामी महाविकास आघाडीचं (MVA Government) सरकारच कोसळलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेली युती पटली नाही, उद्धव ठाकरे वेळ देत नाही, त्यांच्या आजुबाजूची लोकं त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही अशी अनेकल कारणं देत शिवसेनेतले तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत पक्षाबाहेर पडले अन् भाजपसोबत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला. 2019 साली झालेल्या सत्तासंघर्ष दरम्यान आपल्यालाच मुख्यमंत्री करण्याच्या चर्चा सुरु होत्या, मात्र नंतर तसं झालं नाही हे सांगत एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात आपली खदखद व्यक्त केली. त्यानंतर अखेर त्यांनी आज ती मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवलीच.
"मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला, त्यावेळी तेथे उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या." अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसत असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी शिंदे गटातील नेते दीपक केसरकर म्हणाले, देवाचा आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री दालन आता सर्वसामान्य लोकांसाठी खुले झाले आहे. आज तो अनुभव आम्हाला अनेक वर्षांनंतर आला. रिक्षावाला म्हणून मुख्यमंत्र्यांना हिणवल गेलं. पण, आता रिक्षावाल्यांसाठी स्टॅण्ड तयार करणार आहोत, असा निशाणा त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर साधला आहे.
दरम्यान, राज्यच गत वैभव परत येईल. आजचा दिवस राजकारणाकडे पलीकडे जाऊन आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री राहिले. तेव्हा देखील वर्षावर प्रवेश होता. बाळासाहेब हे राज्याचे दैवत आहेत. ते सर्वांचे आहेत आणि राहणार, असेही केसकरांनी सांगितले आहे.