Eknath Shinde
Eknath Shinde

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ते संगमनेर येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :
Naresh Shende
Published on

CM Eknath Shinde Sangamner Speech : महायुती सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं. या नामकरणाविरोधात काही लोक हायकोर्टात गेले होते. परंतु, हायकोर्टाने त्यांचं अपिल फेटाळून लावलं आहे. महाविकास आघाडीने या नावांना विरोध केला होता. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला, अशा औरंगजेबाचं नाव राहावं, म्हणून महाविकास आघाडीचे लोक कोर्टात गेले. या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. हे लोक हिंदूस्थानात राहून पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ते संगमनेर येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

विरोधकांवर टीका करत शिंदे पुढे म्हणाले, काँग्रेसचे वडेट्टीवार म्हणतात, हेमंत करकरे यांना कसाबची गोळी लागली नाही. हेमंत करकरे, कामटे, साळसकर, तुकाराम ओंबळेंनी कसाबच्या सर्व गोळ्या पोटात घेतल्या, अशा शहिदांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? फारुक अब्दुल्ला म्हणतो, पाकिस्तानने बांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, काय बोलतात हे लोक? या देशाचं मीठ खाताय आणि पाकिस्तानचं कौतुक करत आहेत, अशा काँग्रेसला तुम्ही मतदान करणार आहात का? अशा महाविकास आघाडीला तुम्ही मतदान करणार? अशा उबाठाला तुम्ही मतदान करणार? असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

काँग्रेसच्या काळात पाकिस्तानचे दहशतवादी आपल्या सैनिकांवर हल्ला करत होते. पण आता आपल्यावर हल्ला करण्याची त्यांची हिंम्मत होत नाही. आता मोदी आपले सर्वात मोठे अणुबॉम्ब आहेत. थेट पाकिस्तानमध्ये घुसून मारणार, असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला लाभले आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यावर पुलवामाचा बदला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करुन घेतला. आता आपला भारत बोलतो आणि जग हालतो, अशी परिस्थिती आता आहे.

आज शरद पवार म्हणाले, सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलिन व्हावं, आता उबाठाचं काँग्रेसमध्ये याआधीच विलिनीकरण झालेलं आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना ते काहीच बोलत नाहीत. ते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, काँग्रेसपासून लांब राहा. माझी काँग्रेस होऊ देणार नाही. माझी काँग्रेस होईल, तेव्हा मी शिवसेना दुकान बंद करेल.

आज तुम्हाला पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांसोबत बसावं लागत आहे, अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहेत का? हिंदूस्थानमध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना इकडे थारा नाही. आता सदाशिव लोखंडेंना दिल्लीत पाठवायचं आहे. लोखंडेंना मत म्हणजे मोदींना मत, म्हणून येत्या १३ तारखेला त्यांना निवडून आणायचं आहे, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com