केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही; कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचे थेट अमित शाह यांना आव्हान
कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सीमावाद चिघळलेला असतानाच कन्नड संघटनांनी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर १४ डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले असून त्यांच्याशी गृहमंत्री चर्चा करणार आहेत. मात्र अमित शाह यांनी दखल घेतल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं आहे. सोमवारी कर्नाटकच्या खासदारांसह आपण अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अमित शाह यांच्यासमोर आपण राज्याची कायदेशीर भूमिका मांडणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियावर ट्विट करुन अमित शाहांना आव्हान दिलं आहे. बोम्मई म्हणाले की, “महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने याआधीही असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमची बाजू भक्कम आहे. सीमावादावर आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही,” असे बोम्मई म्हणाले.