चीनच्या कुरापती सुरुच! एकीकडे शांततेसाठी चर्चा अन् दुसरीकडे हवाई हद्दीवर घिरट्या
एकीकडे शांततेसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु असताना दुसरीकडे भारतीय हद्दीत (Indian LAC) कुरापती करण्याचे चीनने (China) प्रयत्न थांबताना दिसत नाहीये. कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेनंतरही, चिनी लढाऊ विमानं पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) उड्डाणं दिसत आहेत. गेल्या तीन-चार आठवड्यांत असं अनेकदा घडलं आहे. चिनी विमानांच्या या कारवाईकडे सीमेवरील भारतीय संरक्षण यंत्रणेची हेरगिरी म्हणून पाहिलं जातंय. त्याचवेळी भारतीय हवाई दल या सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, जे-11 सह चिनी लढाऊ विमानं सतत भारतीय हद्दीच्या जवळून उड्डाणं घेत आहेत. असंही दिसून आलंय की, चिनी विमानांनी 10 किमीची निर्धारित सीमा ओलांडली असून, या कृतीला सैन्याच्या भाषेत कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणतात. त्याचबरोबर चीनच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानेही ठोस पावलं उचलली आहेत. भारतानं सीमेजवळ मिग-29 आणि मिराज 2000 सारखी विमानं तैनात ठेवली आहेत. जेणेकरुन चीनकडून काही गैरकृत्य होत असेल तर त्याला चोख उत्तर देता येणार आहे.
चिनच्या या कुरापतींमागे 'भीती' हेच कारण असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. खरं तर, भारतीय हवाई दलानं लडाख सेक्टरमध्ये आपल्या तळावरील तंत्रज्ञान आणि सुविधा वाढवल्या आहेत. इथून चीनच्या हालचालींवर नजर ठेवणं सोपं झालं आहे. भारतीय हवाई दलामध्ये चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता निर्माण झाली असून, लढाऊ विमानांच्या उड्डाण पद्धतींवरही बारकाईनं लक्ष ठेवून आहे. चिनी विमानं किती उंचीवर उडतात यावर बारकाईने लक्ष ठेवले जातंय. गेल्या महिन्याच्या 24-25 जूनपासून चिनी विमानांकडून या कुरापती सुरु आहेत. तेव्हापासून, एलएसीजवळील चुमार सेक्टरमध्ये अनेक वेळा सीमारेषेचे उल्लंघन झालं. तेव्हापासून ते सातत्यानं सुरू आहे. त्याच वेळी, भारतीय हवाई दलानं या भागावर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.