China Tiwan Disputes : चीनची लढाऊ विमानं तयार; तैवानवर हल्ला होण्याची शक्यता
अमेरिकेच्या वरीष्ठ सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीनंतर चीन आणि तैवानमध्ये तणाव वाढला आहे. पेलोसी यांच्या भेटीनंतर चीडलेल्या चीनने तैवानच्या परिसरात लष्करी सराव जोरदार लष्करी सराव करत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने तैवानभोवती 100 हून अधिक फायटर प्लेन तैनात केले आहेत. त्याचबरोबर, चीनने आपलं अत्याधुनिक एअर-फ्युएल YU-20 विमानंही युद्धासाठी तैनात केली आहेत. तैवानच्या जवळच्या भागात चीनच्या हालचाली पाहिल्यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानने चीनला त्यांचा लष्करी सराव त्वरित थांबवण्याची विनंती केली आहे. चीनचे सैन्य तैवानच्या आसपास लष्करी कारवाया करत असल्याचे चीन सरकारच्या ग्लोबल टाईम्स वृत्त पत्राने ट्विट केलेल्या एका व्हिडिओमधून दिसतंय.
लष्करी सरावात नवीन विमानंही उतरली
तैवानसोबतच्या तणावादरम्यान चीनने जारी केलेल्या व्हिडिओचा मुख्य अजेंडा म्हणजे चीनची लष्करी ताकद दाखवणे हा आहे. फायटर प्लेनपासून अत्याधनुनिक लढाऊ विमानांच्या समावेशापर्यंतचा सराव तैवानसाठी एक इशारा आहे. बीजिंग पूर्वूीपासूनच तैवानवर आपला हक्क सांगत आला आहे. तैवानच्या आजूबाजूच्या सहा भागात लढाऊ विमानं, नौदलाची जहाजं आणि क्षेपणास्त्र हल्ले यांचा समावेश असलेले युद्ध सराव सुरू केल्याचं चीनचं म्हणणं आहे. हा युद्ध सराव तैवान बेटाच्या किनाऱ्यापासून 20 किलोमीटर (12 मैल) अंतरावर आहे. तैवानच्या प्रादेशिक सीमेचं उल्लंघन चीन करत असल्याचं दिसतंय.
पेलोसी यांची भेट चीन धोरणाचं उल्लंघन
नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यानंतर चीनने या आठवड्याच्या सुरुवातीला लष्करी सराव सुरू केला आणि त्यांच्या भेटीनं संयुक्त चीन धोरणाचं उल्लंघन केलं असं म्हटलं आहे. गरज पडल्यास चीन तैवान बेट बळाचा वापर करुन ताब्यात घेईल, अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे.