चीनचं जहाज श्रीलंकेच्या बंदराकडे करतंय कूच; भारताच्या डोक्याचा ताप वाढणार?
नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. चीनचं जहाज श्रीलंकेच्या बंदराकडे येत असल्याची माहिती समोर आली आहे. चीनचं संशोधन आणि सर्वेक्षण जहाज 11 ऑगस्ट रोजी दक्षिण श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर पोहोचण्याची शक्यता आहे. याबद्दल बोलताना भारताच्या वतीनं या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.
श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल नलिन हेरथ यांनी सांगितलं की, भारताच्या वाढलेल्या चिंतेची श्रीलंकेला जाणीव आहे. मात्र हा एक नियमित सराव आहे असं श्रीलंकेनं सांगितलं आहे. "भारत, चीन, रशिया, जपान आणि मलेशिया या नौदलाच्या जहाजांनी आम्हाला वेळोवेळी मदत मागितली आहे. त्यामुळे आम्ही चीनलाही परवानगी दिली आहे." श्रीलंकेनं सांगितलं की, आण्विक सक्षम जहाजं येणार असतील, तेव्हाच आम्ही परवानगी नाकारू शकतो. मात्र सध्या येत असलेलं चीनचं जहाज आण्विक क्षमतेचं जहाज नाही.
दरम्यान, चीन-तैवानमध्ये सुरु असलेल्या संघर्षाला आता हिंसक वळण लागलं आहे. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीनने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, चीनने तैवानला वेढा घालण्यास सुरुवात केली आहे. चिनी सैन्यानं तैवानला 6 बाजूंनी घेरलं असून, समुद्रातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात झाली आहे. चिनी सैन्याने तैवानला पाण्याबरोबरच हवाई क्षेत्रातही घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विमानांची वाहतूक थांबवण्यात आली असून तैवानमधील काही बंदरंही बंद करण्यात आली आहेत. चिनी सैन्यानं आपल्या लष्करी सरावाची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र तैवानने दावा केलाय की, चीनने आण्विक क्षमता असलेल्या डोंगफेंग क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला आहे. चिनी सैन्यानं मंगळवारी युद्ध सराव सुरू केला होता, गुरुवारी चीननं थेट हल्ले करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. ७ ऑगस्टपर्यंत हा सराव सुरु राहणार असल्याचं चिनी सूत्रांचं म्हणणं आहे. चीनने तैवान हा आमचाच भाग असल्याचा दावा केला असून, आतापर्यं तैवानने मात्र हा दावा फेटाळला आहे.