Eknath Shinde: जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंना शिवीगाळ, मुंबईच्या माजी महापौरांविरोधात गुन्हा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.
शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी (२७ नोव्हेंबर) भांडुपमधील ईशान्य मुंबईत मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी जोरदार टीका केली होती. यावेळी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करत आहेत.
सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.